शासन निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी काढला
मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक जागांवर तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाणे तसेच धूम्रपान करणे यावर सध्या बंदी आहे. मात्र अशा ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ खाणे, थुंकणे तथा धूम्रपान केल्यास २०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी काढला.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा तसेच कोटपा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक ३० सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींना अनुसरून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये दरवर्षी ८ ते ९ लाख मृत्यू हे तंबाखू सेवनामुळे होत असतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्याने तसेच थुंकण्याने विविध आजारांचा फैलाव होत असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे, तसेच धूम्रपान करण्यास बंदी आहेच. पण आता या ठिकाणी ही उत्पादने वापरल्यास २०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात येणार आहे.
शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, शासकीय संस्था, कार्यालयातील कामाच्या जागा, उपाहारगृहे, शाळा व महाविद्यालये अशा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. सोबत शासकीय-निमशासकीय कार्यालये व परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी इतरही उपाययोजना करण्यात येणार आहेत. शासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यासंबंधीची सर्व माहिती देणारा फलकदेखील लावण्यात आहे.