जळगावच्या कंडारी येथील घटना, एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कंडारी येथील २४ वर्षीय तरुणाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल असून याप्रकरणी होमगार्डसह एकाला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी अथक परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला आहे. संशयित आरोपींना नशिराबाद पोलीस स्टेशनच्या ताब्यात आले आहे.
राहुल उर्फ गोलु युवराज भिल (वय २४, रा. कंडारी ता. जळगाव) हा दि. ०२ जुलै रोजी गावातून सकाळी १० वाजता घरून गेला होता. त्यांनतर गावातील लोकांनी त्यास सायंकाळी ०७.३० वाजेनंतर गावात फिरतांना पाहिले होते. त्यानंतर तो घरी आला नव्हता. म्हणून त्याचे वडील युवराज भिल यांनी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे दि. ०६ रोजी हरविल्याची नोंद केली होती. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता राहुल उर्फ गोलू याचे प्रेत हे रायपुर ता. जळगाव शिवारातील पाटचारीजवळ संशयास्पदरित्या मिळुन आले होते. सदर बाबत एम.आय.डी.सी पो.स्टे जळगाव ला अकस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता.
होमगार्डवर आला संशय
सदर प्रेत हे संशयास्पदरित्या मिळून आल्याने राहुल उर्फ गोलू याचा कोणीतरी खुन केल्याबाबतची खात्रीशीर मीहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन कडुन तपास सुरु होता. तपासातून तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. दि. २ रोजी मयत राहुल उर्फ गोलु हा गावातील राहणारा जयराम धोंडु कोळी व बादल परदेशी यांचे बरोबर दिवसभर दारु पित असल्याबाबतची माहिती मिळाली. जयराम धोंडु कोळी याचा राहुल उर्फ गोलू याच्याशी वाद झाला होता. सदर ठिकाणी जयराम धोंडु कोळी याचा मित्र होमगार्ड असलेला भूषण उर्फ भुरा पाटील रा. वराडसिम ता. भुसावळ जि. जळगाव हा देखील आल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्यास काल दि. १० जुलै रोजी वराडसिम येथून ताब्यात घेतले होते.
घटनाक्रम व कारण उघड
भूषण पाटील याची अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल करुन चौकशीत घटनाक्रम सांगितला. दि. २ रोजी रात्रीच्या वेळेस ०८.३० वाजेच्या सुमारास कंडारी गावातुन मयत राहुल उर्फ गोलू यास मोटार सायकलवर मध्यभागी बसवून घेवून गेलो. मोटार सायकल ही जयराम चालवत होता व भूषण मागे बसला होता. संशयित जयराम व भूषण याने त्याला संध्याकाळी जयराम याच्याशी भांडण केल्याच्या कारणावरून रागाच्या भरात मारहाण केली होती व त्यामध्ये तो जागेवर मेला होता. त्यावेळी त्याची ओळख पटु नये म्हणून त्याचे प्रेत हे पाटचीराच्या खाली असलेल्या पाईपामध्ये लपवुन दिले होते व पाईपाला दोन्ही बाजुने दगड लावुन दिले होते. तसेच जयराम याने राहुल याचे अंगावरील कपडे काढून कुठेतरी फेकुन दिले होते.
पोलीस पथकाचे परिश्रम
सदर बाबतीत मयत राहुल उर्फ गोलू याचे वडील युवराज दलपत भिल रा. कंडारी ता. जळगाव यांनी दिलेल्या फिर्याद वरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा हा पुढिल तपास कामी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस उपनिरीक्षक रविद्र गिरासे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, ईमान सैय्यद, तुषार गिरासे, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुदस्सर काझी, सचिन पाटील,साईनाथ मुंढे, पोलीस चालक ईम्तियाज खान, चालक मनोज पाटील, जगदिश भोई अशांनी केले आहे.
सदर घटनास्थळी कोणताही पुरावा नसतांना एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनने कंडारी गावात सलग ३ दिवस माहिती काढुन सदरचा खुन उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्ह्यतील जयराम धोंडु कोळी हा नशिराबादला दाखल असलेल्या दुस-या गुन्ह्यात यापुर्वी अटक आहे. भुषण याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढिल तपास नशिराबाद पो.स्टे करीत आहे.