नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सध्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान आता प्राण्यांना देखील कोरोनाचा अधिक धोका असल्याची माहिती समोर येत आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. आठ सिंहाना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता दोन सिंहिणी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये असणाऱ्या लायन सफारी पार्कमधील (दोन सिंहिणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. गौरी आणि जेनिफर असं या सिंहिणींचं नाव असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सफारी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आता दोन सिंहिणींची प्रकृती स्थिर आहे. इटावा सफारी पार्कचे संचालक केके सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. इटावा सफारीमध्ये असणाऱ्या या दोघींची तब्येत गेले काही दिवस खराब होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.