अहमदाबादहून चोरी झालेली कार जळगावात जप्त; संशयित आरोपी जेरबंद
जळगाव (प्रतिनिधी):- अहमदाबाद ग्रामीण अंतर्गत बोपल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील ९ लाख रुपये किमतीची ग्रे रंगाची किया कंपनीची कॅरेन्स मोटार कार (क्र. MP 04 ZL-5155) जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी जप्त केली आहे. नाकाबंदी दरम्यान पाठलाग करून ही कारवाई करण्यात आली.
सदर कार १८ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजता नशिराबाद टोल नाका पार करून जळगावकडे येत असल्याची माहिती बोपल पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली होती. या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी काशिनाथ चौकात नाकाबंदी करत असताना सायंकाळी ७:१५ वाजता सदर कार वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने कार अजिंठा चौफुलीकडे पळवली. पोकॉ रमेश अहिरे व पोकॉ अफजल बागवान यांनी पाठलाग करून अजिंठा चौफुली येथील हिरो होंडा शोरुमसमोर कार थांबवली. खात्री झाल्यानंतर कार व चालकाला ताब्यात घेण्यात आले. १९ जून रोजी जळगावात आलेल्या बोपल पोलिसांच्या स्वाधीन मुद्देमाल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संदीप सपकाळे, पोकॉ रमेश अहिरे व पोकॉ अफजल बागवान यांनी केली.











