मुंबई ;- देशात दिवसेंदिवस कोरोने रुग्ण वाढत चालले आहेत. अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात आहेत. आता नदीम श्रवण संगीतकार जोडीमधील श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.श्रवण यांना मुंबईतील एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना इतरही काही आजार असल्याचे समजते.
१९९० च्या दशकात नदीम-श्रवण या जोडीने अनेक चित्रपटांना हिट संगीत दिले आहे. नदीम सैफी आणि श्रवण राठोड या दोघांची जोडी लोकप्रिय ठरली. आशिकी चित्रपटातील त्यांची प्रसिध्द रोमँटिक गाणी चांगलीच गाजली आहेत. या जोडीने आशिकी, साजन, दिवाना, फूल और कांटे, राजा हिंदुस्तानी, जान तेरे नाम, सडक, धडकन, परदेस, दिलवाले, दिल है के मानता नही, साथी, रंग, राजा अशा अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे.
दोघांनी पहिल्यांदा १९७७ मध्ये भोजपुरी चित्रपट ‘दंगल’साठी संगीत दिलं होतं. यामधील ‘काशी हिले पटना हिले’ खूप हिट ठरले होते. पुढे बॉलिवूड चित्रपट ‘जीना सीख लिया’साठी संगीत दिलं आहे. ‘आशिकी’मधील गाण्यांना संगीत दिल्यानंतर गाणी आणि चित्रपट दोन्हीही हिट ठरले.