उद्या शपथविधी, जळगावच्या गुलाबरावांचा समावेश
मुंबई (प्रतिनिधी) :- राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर दृष्टीपथात आला आहे. शनिवारी मुंबईतील राजभवनात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडेल. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेला एकूण 9 मंत्रीपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे.
यामध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य संतुलन राखले आहे. अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचाही समावेश आहे. ठाण्यातील शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे या नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. हे सगळेजण उद्या राजभवनात होणाऱ्या सोहळ्यात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या सगळ्यांच्या वाट्याला कोणती खाती येणार, हे बघावे लागेल. दरम्यान, भाजपने दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला विरोध केला होता. त्यामुळे या अनुभवी नेत्यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचे दिसत आहे.
संभाव्य मंत्री
एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री
उदय सामंत
शंभूराजे देसाई
गुलाबराव पाटील
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाठ
भरत गोगावले
आशिष जयस्वाल
योगेश कदम (राज्यमंत्री)
विजय शिवतारे (राज्यमंत्री)
कोल्हापूर – प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र यद्रावकर (राज्यमंत्री)