यावल तालुक्यातील घटना
यावल (प्रतिनिधी) :- यावल ते भुसावळ रस्त्यावरील शेताच्या बांधावर विजेचा धक्का लागल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरू होते.
येथील भुसावळ मार्गावरील रस्त्यावर एका शेतातील बांधावर ३४ वर्षीय तरुण मयत अवस्थेत मिळुन आला आहे. मयत व्यक्तीचे नाव विशाल रमेश मेढे (३४, रा. अडावद ता. चोपडा) असे आहे.
तरुणाचा मृतदेह यावल भुसावळ मार्गावरील रस्त्यावर टेलीफोन एक्सचेंजच्या कार्यालयासमोरील परिसरातील शेताच्या बांधावर आढळून आला आहे. सदर इसम हा शॉक लागल्याने जागीच मरण पावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. परिसरात घटनेची माहिती मिळताच लोकांनी धाव घेत मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविला. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.