चंद्रपूर (प्रतिनिधी) – येथे सेल्फी काढण्याच्या नादात रविवारी १६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ४ युवकांचा बुडून मृत्यू झाला. नागभीड तालुक्यातल्या घोडाझरी सिंचन तलावावरील येथे घटना घडली. वरोरा तालुक्यातील शेगाव येथील ८ युवक पावसाळा सुरु झाल्यामुळे सहलीसाठी गेले होते. यातील एक युवक सेल्फी काढण्याच्या नादात तलावात घसरला, त्याला वाचविण्याच्या नादात पाण्यात उतरलेल्या अन्य ३ युवकांना देखील जलसमाधी मिळाली. दरम्यान स्थानिक पोलीस आणि आपत्ती निवारण पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. चंद्रपूर जिल्हास्थानाहून अधिक बचाव कुमक शोधकार्यासाठी रवाना केली जात आहे. पोलीसही घटनास्थळी पोहचले आहेत.
घटनेत मृतकांमध्ये, मनीष श्रीरामे (२६), धीरज झाडें (२७), संकेत मोडक (२५), चेतन मांदाडे (१७) यांचा समावेश आहे. शेगाव येथील आठ युवक रविवारी पार्टीसाठी घोडझारी तलाव येथे आले होते. घोडाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला त्याच्या पाठोपाठ तीन जण पडले. सोबतच्या चार सहकाऱ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पावसामुळे घोडझरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे त्यांचा पत्ता लागला नाही. सध्या शोध सुरु असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.