सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील नागद रोडवरील पेट्रोल पंपासमोरील शेतातील पडीत घरात अघोरी पुजा करून गुप्तधन शोध करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चाळीसगाव शहर पोलीसांनी केली आहे. याप्रकरणात पोलीसांनी जळगाव जिल्ह्यातील व नाशिक येथील ९ जणांना ताब्यात घेतले असून मोबाईल, कार आणि अघोरी पुजा करण्याचे साहित्य असा एकुण ८ लाख ३५ हजारांचा मु्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नागद रोडवरील नायरा पेट्रोल पंपसमोरील शेतातील पडीत घरात काही व्यक्ती अघोरी पुजा करणार आहे अशी माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. पवन पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रवाना झाले. त्यानंतर पोलीसांनी छापा टाकून नऊ संशयितांना ताब्यात घेतले. लक्ष्मण शामराव जाधव (वय-४५ वर्ष रा. खडकी बायपास ता. चाळीसगांव), शेख सलीम कुतुबुददीन शेख (वय-५६ वर्ष रा. हजरत अली चौक, नागद रोड,चाळीसगांव), अरूण कृष्णा जाधव (वय ४२वर्ष रा.आसरबारी ता.पेठ जि.नाशिक), विजय चिंतामण बागुल (वय-३२, वर्ष रा. जेल रोड नाशिक), राहुल गोपाल याज्ञीक (वय-२६, वर्ष रा. ननाशी ता.दिंडोरी जि.नाशिक), अंकुश तुळशीदास गवळी (वय २१ वर्ष रा. जोरपाडा ता. दिंडोरी जि.नाशिक), संतोष नामदेव वाघचौरे (वय ४२ वर्ष रा.अशोकनगर नाशिक), कमलाकर नामदेव उशीरे (वय ४७ वर्ष रा.गणेशपुर पिंप्री ता.चाळीसगाव जि.जळगाव), संतोष अर्जुन बाविस्कर (वय-३८, वर्ष रा.अंतुर्ली (कासोदा) ता.एरंडोल जि.जळगाव) यांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल टकले, सपोनि सागर ढिकले, राहूल सोनवणे, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोशि रविंद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, आशुतोष सोनवणे, चालक नितीन वाल्हे व चालक गणेश नेटके, पोकॉ भरत गोराळकर, पोकॉ पवन पाटील, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे यांनी कारवाई केली. संशयित आरोपी गोलाकार स्थीतीत खाली बसुन त्यामध्ये मानवी खोपडी ,लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळया धातुचा नाग, पत्रावरील छापील देव, कंदमुळे,गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुर,आगरबत्ती पुडा,लोखंडी अडकीत्ता व कापुराची पुजा मांडुन गुप्तधना करीता आघोरी कृत्य करीत असल्याचे समोर आले. मोबाईल, कार आणि अघोरी पुजा करण्याचे साहित्य असा एकुण ८ लाख ३५ हजारांचा मु्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोकॉ पवन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सागर ढिकले व पोकॉ प्रकाश पाटील हे करीत आहेत.
अघोरी विद्याच्या सहाय्याने गुप्तधन शोधणे, चमत्काराचा प्रयोग प्रसारीत करणे व आर्थिक फसवणुक करणे, नरबळी देणे, अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणे, पैशाचा पाउस पाडणे, अघोरी उपाय करुन रुग्णांवर उपचार करणे किंवा भानामती करणे, अतिंद्रीय शक्ती असल्याचे भासवुन लोकांमध्ये दहशत करणे, मंत्रांच्या सहाय्याने भुत पिशाच्च दुर करण्याबाबत शक्ती असल्याचे भासवुन उपचार करणे, मानसिक विकलांग व्यक्तींमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवुन त्यादवारे इतरांची फसवणुक करणे, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या इसमांबाबत माहीती प्राप्त झाल्यास तात्काळ पोलीसांना माहीती कळवावी जेणेकरुन अशा गुन्ह्यातील आरोपीतांना कायमचा पायबंद घालणेकामी वेळीच मदत होईल याबाबत चाळीसगाव शहर पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे.
अंनिसकडून पोलिसांचे कौतुक
सदर कारवाईबाबत पोलिसांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अभिनंदन केले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. तसेच, याप्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. घटनेची समितीकडून माहिती घेण्यात आली असून लवकरच अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती अंनिसतर्फे देण्यात आली आहे.