सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक


सावदा | प्रतिनिधी : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, विमल पानमसाला व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला सावदा पोलिसांनी कारवाई करून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून गुटखा व वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १०.५० वाजता सावदा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, राखाडी रंगाच्या होंडा अमेझ कारमधून (क्र. एमएच-१९-सीव्ही-४४४५) प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक केली जाणार आहे. ही कार तांदलवाडी फाट्याच्या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला.
रात्री सुमारे ११.०४ वाजता संशयित कार येताना दिसताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. कारचालक सारंग मुरलीधर अवचार (वय ३१, रा. अकलूद, ता. यावल, जि. जळगाव) याची चौकशी केली असता त्याने कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे सांगितले.
दोन पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि तंबाखूची पाकिटे आढळून आली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला व तंबाखूची विविध पाकिटे असा ५ लाख २७ हजार ७०० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. तसेच गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली होंडा अमेझ कार, किंमत ५ लाख रुपये, अशी जप्ती करण्यात आली.
अशाप्रकारे पोलिसांनी एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने हा प्रतिबंधित माल मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील एका व्यापाऱ्याकडून आणला असून, भुसावळ व वरणगाव परिसरात त्याची किरकोळ विक्री करण्याचा उद्देश असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२२२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, १०६, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a), ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोहेका/४६८ निलेश बाविस्कर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.









