ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार


७१ हजारांचा मुद्देमाल जप्त; सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सावदा: सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हतनूर रस्त्यावर रात्रगस्त घालत असलेल्या पोलीस पथकाने धाडसी कारवाई करत संशयितरित्या ट्रकच्या बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडले. त्याच्याकडून ३२ हजार रुपये किमतीच्या ३ बॅटऱ्या आणि ५० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल शांताराम कोळी (वय २८, रा. कडगाव, ता. यावल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑगस्टच्या मध्यरात्री १:३० च्या सुमारास उदळी बसस्थानकाजवळ सीबीझेड मोटारसायकलवरून गोणपाट घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच चालकाने पळ काढला, मात्र पाठीमागे बसलेल्या विशाल कोळी याला पोलिसांनी जागीच पकडले, तर चालक मोहन कोळी पसार झाला. संशयिताकडून जप्त केलेल्या बॅटऱ्या जळगाव शहरातून ट्रकमधून चोरल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुनील कुरकुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.









