जळगावच्या नशिराबाद उड्डाण पुलावर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नशिराबाद उड्डाणपुलावर बॅलेनो कार आणि पॅजो रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तरुण विवाहितेचा मृत्यू झाला असून दोन इसम गंभीर जखमी झाले आहेत. तर आणखी दोघे गंभीर झाले आहेत. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.
पॅजो रिक्षा क्रमांक (एम एच १९ बी यु ५८४३) ही भुसावळकडून जळगावला येत असताना समोरून बॅलेनो कार क्रमांक (एम एच १९ ईए ५१०९) ने रिक्षाला जोरात धडक दिली. या भीषण अपघातामध्ये महिला मृत्युमुखी पडली. तर ४ जण गंभीर जखमी झाले. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यातील एक मयत महिला आसमाबी शेख जुबेर (वय ३०) यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तेथे सीएमओ डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले. तर दोन जखमींना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पोलिसांनी दाखल केले. शेख जुबेर शेख मोहम्मद (वय ४०) आणि शेख सादिक शेख इसार (वय ४०) असे जखमींचे नाव आहे. यातील शेख जुबेर यांना पाठीच्या मणक्यांना आणि उजव्या पायाला मार लागला आहे तर शेख सादिक यांना हाताला जखम झाली आहे. याशिवाय करीम बेग शरीफ बेग (वय २९) व शेख उमेमा शेख जुबेर (वय ६) हे जखमी झाले आहे.
प्राथमिक उपचार घेतल्यानंतर दोन्ही जखमी यांना त्यांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, मयत आसमाबी शेख व सर्व जखमी हे बोरखेडा ता. मोताळा जि. बुलढाणा येथील रहिवासी आहेत. नशिराबाद पोलीस हे घटनेची माहिती घेण्याचे काम करीत आहेत.