भुसावळ विभागाची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ रेल्वे विभागाने जानेवारी २०२४ मध्ये १३१.८१ कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल मिळविला आहे. रेल्वेच्या महसुलात विविध क्षेत्रांत लक्षणीय वाढ साधून असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंह यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विभागाला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा मिळाली आहे. प्रवासी महसुलाच्या बाबतीत, भुसावळ विभागाला जानेवारी २०२४ मध्ये ७२.७९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या यशात तिकीट तपासणीने महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, तीन कोटी ५२ लाख रुपयांच्या महसुलाने मासिक उद्दिष्ट ६.७० ने ओलांडले आहे.
विविध कोचिंगमधून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे. ती चार कोटी ५७ लाखांवर पोचली आहे. विविध सेवा देण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेमुळे मालवाहतुकीद्वारे ४८ कोटी ७० लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांनी मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची कुशलतेने वाहतूक केली आहे. पार्सल सेवेने एकूण तीन कोटी रुपयांचा महसूल मिळविला, जे ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यात भुसावळ मंडळाची बहुमुखी प्रतिभा दर्शवते.
या व्यतिरिक्त इतर विविध व्यावसायिक क्रियाकलापांमधून विविध महसूल तीन कोटी ८६ लाखांचा महसूल आहे. ज्यामुळे विभागाच्या आर्थिक यशात आणखी भर पडली. एकंदरीत, भुसावळ विभागाने जानेवारी २०२४ मध्ये १३१ कोटी ८१ लाख रुपयांचा उल्लेखनीय महसूल मिळविला आहे.