ना साक्षीदार, ना हत्यार, ना मोबाईल लोकेशन; ह्युमन इंटेलिजन्सच्या जोरावर तिघे आरोपी गजाआड
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ शहरालगत रेल्वे मार्गालगत झालेल्या ५५ वर्षीय पुजारी संतोष रघुवीर मंचाल यांच्या निर्घृण हत्येचा उलगडा भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत करत तपास कौशल्याची चुणूक दाखवली. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, मोबाईल लोकेशन, हत्यार किंवा घटनास्थळी भौतिक पुरावे उपलब्ध नसतानाही पोलिसांनी ह्युमन इंटेलिजन्स (मानवी गुप्त माहिती), तांत्रिक विश्लेषण आणि कसून चौकशीच्या आधारे तिघा आरोपींना अटक केली.

२८ जून २०२६ च्या रात्री रेल्वे मार्गालगत निर्जन ठिकाणी संतोष मंचाल यांची हत्या झाल्यानंतर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी कोणतेही हत्यार, ठोस भौतिक पुरावे किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने तपास अत्यंत क्लिष्ट बनला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड आदींनी पथकासहीत घटनास्थळी दाखल झाले . दरम्यान, गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालात जबड्यावर आणि बरगड्यांवर झालेल्या जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कोणतेही हत्यार न वापरता केवळ मारहाणीतून मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर आरोपी शारीरिकदृष्ट्या मजबूत, बॉक्सर किंवा सराव केलेला व्यक्ती असण्याची शक्यता पोलिसांनी गृहीत धरली.
तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एका हळदी समारंभातील मारहाणीचा व्हिडिओ लागला. या व्हिडिओमध्ये बॉक्सर म्हणून ओळखला जाणारा हर्षल राजू वर्मा एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले.
मानवी गुप्त माहितीच्या आधारे हर्षल वर्मा आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीत त्यांच्या जबाबातील विसंगती उघड झाल्यानंतर त्यांनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल उत्तम जाधव या तिघांचा हत्येत थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.आरोपी रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरण्यासाठी गेले असताना संतोष मंचाल तेथे पोहोचले. यावेळी झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात तिघांनी संतोष मंचाल यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला.
कोणतेही ठोस भौतिक पुरावे नसतानाही मानवी गुप्त माहिती, वैज्ञानिक तपासपद्धती आणि विविध पोलीस पथकांतील प्रभावी समन्वयाच्या जोरावर भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या खुनाचा छडा लावत आरोपींना गजाआड केले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत उकललेला हा तपास पोलीस यंत्रणेच्या कौशल्यपूर्ण आणि समन्वयात्मक कामगिरीचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.









