अटकेसाठी भुसावळात कर्मचाऱ्यांचे मध्यरात्री ठिय्या आंदोलन
भुसावळ (प्रतिनिधी) – बिहारहून मुंबईकडे जाणाऱ्या अपच्या जनता एक्स्प्रेसमध्ये शनिवारी मध्यरात्री गार्ड व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. गाडी उशिरा धावण्याच्या चौकशीवरून ही हाणामारीची घटना घडली असून, या घटनेनंतर भुसावळ स्टेशनवर गाडीतील रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी मध्यरात्री रेल्वेच्या गार्ड कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केेले. या हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलिस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता, तसेच यावेळी स्टेशनवर ड्युटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते.
बिहारकडून येणारी पटना एक्स्प्रेस रात्री बारा वाजता खंडवा स्टेशनवर आल्यानंतर या गाडीला खंडव्याहून भुसावळपर्यंत एस्कॉर्ट सुरक्षा देण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजीव कुमार, दीपेंद्र सोलंकी व संदीप कुमार यांच्यावर देण्यात आली होती. खंडव्याला ही गाडी तब्बल पाऊण तास उशिरा आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी हे सुरक्षा रक्षक पोलिस गार्डच्या डब्यात गेले. तेथे रजनीकांत डे व त्यांच्या सोबत असलेले राजेश मीना यांनी या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांसोबत मोठमोठ्याने आवाज करून वाद घातला. यावेळी सुरक्षा रक्षक संदीप कुमार व एका गार्डमध्ये जोरदार हाणामारीही झाली. खंडवा येथून बऱ्हाणपूर स्टेशनवर गाडी आल्यानंतरही या कर्मचाऱ्यांमध्ये वाद होऊन अर्धा तास गाडीचा खोळंबा झाला.
हाणामारीची घटना भुसावळ रेल्वे पोलिस व जीआरपी पोलिसांना समजल्यानंतर दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता, तसेच यावेळी स्टेशनवर ड्युटीसाठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते. भुसावळ स्टेशनवर मध्यरात्री अडीच वाजता गाडी आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जोरदार वाद झाला. यावेळी गार्ड कर्मचाऱ्यांनी रेल्वे पोलिसांना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. यानंतर जीआरपी पोलिसांनी रेल्वे पोलिसांसह रेल्वेतील दोन्ही गार्ड कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन, गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली. दोघांच्या तक्रारीवरून जीआरपी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. घटनेची तक्रार खंडवा स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे.