गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात विविध उपक्रम
जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्ञान, अध्ययन, संशोधन आणि बौद्धिक विकासाला चालना देणार्या ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्राचार्य विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व, सातत्यपूर्ण अध्ययन, ग्रंथालयातील उपलब्ध विविध साधनसामग्रीचा प्रभावी वापर तसेच शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी वाचनाची सवय विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्ताने भारतातील ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे देशातील ग्रंथालय चळवळीला मिळालेली दिशा आजही विद्यार्थ्यांसाठी आणि ज्ञानसाधकांसाठी प्रेरणादायी आहे.ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नसून ज्ञान, विचार, प्रेरणा आणि आयुष्यभराच्या शिक्षणाचा अमूल्य खजिना आहे.
४० नर्सिंग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
अवयवदानाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे १३ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मेडिकल-सर्जिकल नर्सिंग विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना अवयवदान ‡ जीवनाचे दान द्या अशी होती. अवयवदानाचे महत्त्व, त्यातून गरजू रुग्णांना मिळणारे नवजीवन आणि समाजातील प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज याविषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी ४० नर्सिंग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जनजागृती रॅली काढली. विद्यार्थ्यांच्या हातात अवयवदानाचे महत्त्व सांगणारे फलक, पोस्टर्स आणि जनजागृतीपर घोषवाक्ये होती. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधत अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न केला.अवयवदान हे माणुसकीचे महान कार्य असून, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनाची नवी आशा मिळू शकते, हा संदेश विद्यार्थ्यांनी जनतेपर्यंत पोहोचविला.एक अवयवदाता अनेकांचे जीवन वाचवू शकतो; चला, जीवनदानाची ही चळवळ पुढे नेऊया! असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.











