जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण भागातील रामेश्वर कॉलनी येथील परिसर सर्वे नंबर २७९ च्या खुला भुखंडजवळील नाल्यात एम.आय.डी.सी. मधील रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हे पाणी नाल्यात सोडणे बंद व्हावे म्हणून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना विचार वारसा फाउंडेशनतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही नको तो त्रास भोगत आहे. एम. आय. डी. सी. मधील रसायनयुक्त पाणी आमच्या घराजवळील नाल्यात सोडल्यामुळे सर्व नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. या त्रासामुळे परिसरातील काही रहिवाशांना मोठ्या आजाराला सामोरे जावे लागले. असे अनेकांच्या आरोग्याला धोका होत असून आमच्या तक्रारींची आपण तात्काळ दखल घेऊन मार्गी लावावी.
एम आय डी सी मधील सोडलेले रसायनाचे पाणी या नाल्यातून तातडीने बंद करावे, असेही निवेदनात म्हटलेले आहे. निवेदन देताना विचार वारसा फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल देशमुख, ललित शर्मा, आशिष राजपूत, अभिजित राजपुत, ऋषिकेश राजपुत, मयुर डांगे, संकेत म्हस्कर, राहुल देशमुख आदी नागरिक उपस्थित होते.