जळगावच्या महिला रिमांड होम येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : बाथरूममधील नळ तोडल्याचा जाब विचारल्याने एका तरुणीने महिला पोलिसाला शिवीगाळ करीत तिच्या हातातील कड्याने मारहाण केली. ही घटना दिनांक १९ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आशादीप महिला शासकीय निरीक्षणगृहात घडली. याप्रकरणी तरुणीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झुरिया मोहम्मद अली (२६, रा. मँगलोर, जि. बंटवाडा, कर्नाटक) असे गुन्हा दाखल केलेले तरुणीचे नाव आहे. पोलिस मुख्यालयात नियुक्तीस असलेल्या श्रद्धा रामोशी यांची आशादीप महिला शासकीय निरीक्षणगृह येथे ड्यूटी लावण्यात आली आहे. बुधवार दिनांक १९ जून रोजी दुपारी महिला पोलिस ड्यूटीवर असताना वसतिगृहातील झुरिया मोहम्मद अली ही तरुणी अंघोळीसाठी गेली होती. यावेळी तिने बाथरूममधील प्लास्टिकचा नळ तोडल्यामुळे बाथरूमधील पाणी बाहेर येत होते.
याबाबत जाब विचारल्याने झुरियाने महिला पोलिसाला हातातील कडे मारले. महिला पोलिस रामोशी यांनी झुरियाला जाब विचारला असता, तिने ‘पोलिस कुछ काम करते नहीं, तुम मेरे दानिश को ढुंढ के लाती नहीं असे म्हणत रागाच्या भरात हातातील कडे महिला पोलिसाला मारून त्यांना दुखापत केली. शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणला. महिला पोलिस कर्मचारी श्रद्धा रामोशी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.