आमदार राजूमामा भोळे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये एम.आर.आय. ची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र देऊन मागणी केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे जळगाव जिल्ह्याच्या शहराच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून आदिवासी, दुर्गम भागातील तसेच गोरगरीब, गरजू रुग्ण येत असतात तसेच अपघातातील रुग्णांना देखील सिटीस्कॅनसह अनेकदा एमआरआयची गरज भासत असते. यासाठी यापूर्वी एमआरआय बाबत विविध बैठकांमध्ये चर्चा झालेली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये एमआरआय सुविधा अत्यावश्यक झाली आहे. याकडे आता शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी लक्ष वेधले आहे. आ. भोळे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले आहे. याप्रसंगी रुग्णालयातील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावर ना. मुश्रीफ यांनी, लवकरात लवकर निर्णय घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन याप्रसंगी आ. राजुमामा भोळे यांना दिले आहे.