आज चिमणराव पाटील यांची धक्कादायक माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांचा गट आज भाजपसोबत जाणार असल्याबाबत आज तरी निश्चित आहे. शिंदे आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याबाबत आज तरी सत्य आहे. हा आमचा किंवा पक्षाचा दोष नाही. प्राप्त परिस्थितीने वेगळं वळण घेतलंय, अशी धक्कादायक माहिती एका वृत्तवाहिनीला शिवसेनेचे एरंडोल – पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी दिली आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने आ. चिमणराव पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. आ. चिमणराव पाटील सांगितले की, आमच्या सोबत आज ४० आमदार आहेत. आमच्यात गटनेता बदल करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आमच्या बंडखोर आमदारांमध्ये बैठक झाली. त्यात आगामी निवडणूक ताकदीने व एकदिलाने लढवणेबाबत चर्चा झाली.
शिवसेना आमच्या रक्तात आहे. हिंदुत्वाची कठोर अंमलबजावणी आम्हाला करायची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत आम्ही काम करू शकत नाही. आम्ही वेगळा गट स्थापन करण्याबाबत जड अंतकरणाने निर्णय घेतोय. मला शिवसेनेत २९ वर्षे झाली. उद्धव ठाकरे साहेब यांच्या बाबत आज कटुता निर्माण झाली ही वस्तुस्थिती आहे. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपा सोबत जाणार आहे, आज तरी कन्फर्म आहे अशी खळबळजनक माहिती पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे.