सनिका धिवरे आणि अर्णव धिवरे यांचा स्तुत्य पुढाकार; पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी साधला चिमुकल्यांशी संवाद
जळगाव (प्रतिनिधी) : समाजातील वंचित आणि गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या शासकीय निवासस्थानी एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सनिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून डंपिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या तसेच कचरा वेचून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वंचित कुटुंबांतील लहान मुलांना शासकीय निवासस्थानी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते.


यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः या बालकांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्या. मुलांच्या शिक्षणाबाबत, शाळेतील प्रगतीबाबत तसेच त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीबाबत त्यांनी आस्थेने विचारपूस केली. मुलांनीही त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. पोलीस अधीक्षकांनी दाखविलेल्या या आपुलकीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.
या उपक्रमांतर्गत उपस्थित मुलांना नवीन कपडे, शूज आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. रोजच्या संघर्षमय जीवनात अनेकदा मूलभूत गरजांपासून वंचित राहणाऱ्या या बालकांसाठी हा उपक्रम आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरला. नवीन कपडे आणि शूज मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
विशेष म्हणजे, केवळ वस्तूंचे वाटप न करता या मुलांना शासकीय निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या शिक्षणाची आणि परिस्थितीची विचारपूस करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा पैलू ठरला. समाजातील प्रत्येक बालकाला आनंदाने जगण्याची, शिक्षण घेण्याची आणि चांगले भविष्य घडविण्याची संधी मिळावी, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
सनिका धिवरे आणि अर्णव श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला. वंचित मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.









