खाऱ्यापाडाव शिवारातील वनक्षेत्रात तब्बल १ हजार ८७० किलो गांजाचे पीक; संशयित आरोपी फरार
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडाव शिवारातील वनक्षेत्रात अवैधरीत्या गांजाची शेती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चोपडा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाच्या पिकासह ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या गांजाच्या पिकाचे एकूण वजन १ हजार ८७० किलो असून, त्याची किंमत तब्बल ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलीस अहवालात नमूद आहे.


पोलीस अहवालानुसार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी चोपडा तालुक्यातील खाऱ्यापाडाव शिवारातील वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक २४० मध्ये गांजाची अवैध लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शुभम ज्ञानेश्वर पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात जुम्मा आरसी पावरा (रा. खाऱ्यापाडाव, ता. चोपडा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून गांजाची हिरवी झाडे, पाने, फांद्या आणि मुळांसह पीक जप्त केले. तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीही ताब्यात घेण्यात आली. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन १ हजार ८७० किलो असून, प्रति किलो २५ हजार रुपये या बाजारभावानुसार त्याची किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ च्या कलम २०(अ), २२ व २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.








