पोलिसांसह कृषी विभागाची संयुक्त कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : विना परवाना केळी, कपाशी या पिकांवर फवारणीचे औषध तयार करणाऱ्या निमखेडी शिवारातील धनश्री नगरात राहणाऱ्या संजय संतोष बेलदार (मूळ रा. चुचांडे ता. चोपडा, ह. मु. धनश्री नगर, निमखेडी) यांच्या घरावर पोलिसांसह कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकला. त्याठिकाणाहून २ लाख ४ हजारांचे बनावट औषध जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित संजय संतोष बेलदार (रा. धनश्री नगर) याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बनावट औषधांसह खते विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
चोपडा शिवारातील धनश्री नगरात विना परवाना पिकांवरील औषधी तयार केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना मिळाली. त्यांनी लागलीच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक तयार करीत कारवाईसाठी रवाना झाले. या पथकाने निमखेडी शिवारातील नगरातील संजय बेलदार यांच्या घरात छापा टाकला असता, त्याठिकाणाहून बी. टी. स्पेशल पीक संजीवक, कृषी ह्यूमस संजीवक चोपडा तालुक्यातील कंपनीचे सुमारे २ लाख ४ हजारांचे ३९० लिटर औषधी जप्त करण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, कृषी झुम हे पीक संजीवक औषध बनवून विक्री करण्याच्या त्याच्याकडे परवाना होता. परंतु ते औषध स्वतंत्र कंपनीत बनविणे बंधनकारक होते. परंतु ते औषध तो स्वतःच्या घरात तयार करतांना आढळून आला.
बी. टी. स्पेशल या पीक संजीवकाचा त्याच्याकडे कोणताही परवाना नसतांना संजय बेलदार याने बी. टी. स्पेशल हे पीक संजीवक औषध तयार करुन ते विक्री करीत होता. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते औषधाचे नमुने ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, कृषी अधिकारी विकास बोरसे, जिल्हा गुण नियंत्रक यांच्यासह त्यांचे सहकारी विजय पवार यांच्यासह पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, पोना विजय पाटील, पोकॉ सचिन महाजन, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने केली.