भुसावळ येथे पाच जणांवर गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबत अनैसर्गिक अत्याचार करून त्याच्याकडील पैसे बळजबरीने हिसकावून घेण्यात आले. तसेच त्याने खंडणी दिली नाही म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तृतीयपंथीयाच्या फिर्यादीवरून दोन पुरुष, एक महिला व एका तृतीयपंथीयाविरुद्ध भुसावळ बाजारपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील खडका रोडवर राहणाऱ्या ३२ वर्षीय तृतीयपंथीय व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. ३१ मे रोजी संशयित आरोपी बंटी पथरोड याने त्याचे वाल्मीक नगरातील घरात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. याशिवाय बंटी पथरोडचे साथीदार संशयित हर्षल पाटील, माया डॉन, बंटी पथरोडची पत्नी फज्जो उर्फ सोनी पथरोड आणि संशयित आरोपी तृतीयपंथी जितू उर्फ ज्योती जान यांनी फिर्यादीकडील दीड हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले.
तसेच ७०० रुपये खंडणी दिली नाही म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवारी २२ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास फिर्यादी तृतीयपंथीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला हे करीत आहेत.