एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : कौटुंबिक वादातून दहा दिवसाच्या बाळाला त्याच्या वडिलांनी पळवून नेले. नंतर पोलिसांनी बाळाचा शोध घेण्यात यश मिळवले. त्यामुळे तब्बल १४ दिवसांनी कासावीस झालेल्या आईच्या कुशीत दहा दिवसांचे बाळ विसावले आणि त्याला मायेची ऊब मिळाली. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी याप्रकरणी कसून मेहनत घेतली.
मेहरुण परीसरातील एका विवाहितेचे पती जयवंत गोविंदा भागवत याच्यासोबत कौटुंबिक वाद सुरु होते. या वादातून पती गोविंदा याने तिच्या दहा दिवसांच्या बाळाला दि. १४ मे रोजी कुठेतरी पळवून नेले होते. तेव्हापासून बाळाची आई अस्वस्थ झाली होती. आपले बाळ आपल्याला परत मिळावे यासाठी विवाहितेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने बाळ व तिचा पती या दोघांना न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक शोध पथक तयार करण्यात आले.
फरार जयवंत भागवत याचा कोणताही ठावठिकाणा नसतांना सलग चार ते पाच दिवस माहिती काढून शोध पथकातील अमंलदार पोहेकॉ अनिल तायडे व महिला पोकॉ रामकला राठोड यांनी बाळाच्या आईसह अगोदर धुळे व नंतर सुरत गाठले. जयवंत हा सुरत येथील लिंबायत पोलिस स्टेशन हद्दीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे स्थानिक लिंबायत पोलिसांची मदत घेऊन जयवंतचा शोध घेण्यात आला.
आपल्या मार्गावर पोलीस असल्याचे समजताच जयवंत गोविदा भागवत हा पळून गेला. अधिक तपासाअंती जयवंत भागवत याने त्याचा मित्र जितू कोळी याच्या घरात बाळाला ठेवले असल्याची माहिती मिळाली. जितू कोळी यांच्या घरातून दि. २६ मे रोजी बाळाला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले.
न्यायालयाच्या आदेशाने बाळाला आईच्या ताब्यात देण्यात आले. तब्बल १४ दिवसानंतर बाळ आणि आई यांची भेट झाली. त्यामुळे नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक बबन आव्हाड आणि त्यांचे सहकारी पोहेकॉ अनिल तायडे, मपोकॉ रामकला राठोड यांचे आभार मानले आहे.