यावल तालुक्यातील धुळ्यापाडा येथे आला मिळून
रावेर (प्रतिनिधी) : सात दिवसांपूर्वी तालुक्यातील वाघोड येथून घरात काहीही न सांगता आठ वर्षाचा रुपेश भगवान बारेला हा मुलगा निघुन गेला होता. याबाबत रावेर पोलिस स्टेशन येथे हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी शोधकार्याच्या बळावर रुपेश याचा अवघ्या सात दिवसात शोध लावून त्याला त्याच्या पालकांना सुपूर्द केला आहे. पोलिसांच्या या कार्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
वाघोड ता.रावेर येथील भिमसिंग पारसिंग बारेला यांचा नातु रुपेश भगवान बारेला (वय ८ वर्ष) हा दि. २४ मे रोजी दुपारी अडीच वाजता बाजारातुन कोणास काही एक न कळविता कोठेतरी निघुन गेला होता. रुपेश याचे काका अर्जुन भिमसिंग बारेला यांचे फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर तपास उपनिरीक्षक प्रिया वसावे यांच्याकडे देण्यात आला होता. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन तसेच रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील खानापुर, चोरवड, पाल, अजंदा, कुसुंबा आदी परिसरात सातत्याने शोध सुरु होता.
याच शोध मोहिमेत खानापुर येथील बस स्टॉप परिसरात सदर मुलास काही दुकानदारांनी पाहिल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर मुलाचा शोध घेत असतांना तो यावल तालुक्यातील धुळ्यापाडा गावात असल्याबाबत माहीती मिळाली. हि माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे यांनी फैजपुर उपविभागाच्या सहा. पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांना व रावेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांना तत्काळ कळवली.
सदर मुलाला सुखरुपपणे धुळ्यापाडा ता. यावल येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाला त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासकामी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग व रावेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे यांनी केला. सदर गुन्हा तपासात रावेर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ अर्जुन सोनवणे, पो.कॉ सचिन घुगे, पो.कॉ रविंद्र भामरे यांनी मदत केली.