जळगाव तालुक्यातील आसोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा येथे प्रसिद्ध निर्भय हॉटेलचे मालक खेमचंद चौधरी यांनी त्यांच्याच हॉटेलमध्ये छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. ३१ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हॉटेल व्यवसायिकाच्या आत्महत्यामुळे खळबळ उडाली आहे.
खेमचंद ज्ञानदेव चौधरी (वय २७, रा. असोदा ता. जळगाव) असे मयत व्यावसायिकाचे नाव आहे. तो असोदा गावामध्ये आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ, वहिनी यांच्यासह राहत होता. नवनाथ मंदिराजवळ असलेल्या हॉटेल निर्भयचा खेमचंद हा मालक होता. हॉटेल व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. अनेक दिवसांपासून त्याला आर्थिक समस्या भेडसावत होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
दरम्यान, शुक्रवारी दि. ३१ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये कोणीही नसताना हॉटेलच्या मागच्या बाजूला एका शेडमध्ये खेमचंद चौधरी याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान खेमचंद हा फोन उचलत नाही म्हणून त्याचे नातेवाईक त्याला हॉटेलमध्ये पाहण्यास आले. त्या वेळेला ही घटना उघडकीस आली. यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
खेमचंद याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान हॉटेल व्यवसायिकाच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.