रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
जळगाव (प्रतिनिधी) :- बांधकाम साइटवरील काम पाहण्यासाठी व त्याची लेव्हल मोजण्यासाठी येण्याकरिता आग्रह करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याने महानगरपालिकेच्या अभियंत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवार दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेनंतर घडली आहे. याप्रकरणी संतप्त झालेले महानगरपालिकेचे सर्व अभियंते यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. त्या ठिकाणी तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.
प्रसाद पुराणिक हे महानगरपालिकेमध्ये अभियंता म्हणून नोकरीस आहे. ते काव्यरत्नावली चौकातील महानगरपालिकेच्या कार्यालयात शुक्रवारी बसलेले होते. या वेळेला तिथे भाजपाचा पदाधिकारी असलेले भूपेश कुलकर्णी आले. शिपायाला अर्वाच् भाषेत त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर अभियंता प्रसाद पुराणिक यांना, माझ्या साइटवर तुम्ही लेवल घेण्यासाठी का येत नाही असे म्हणून शिवीगाळ केली.
याचा जाब प्रसाद पुराणिक यांनी विचारला असता त्यांना भूपेश कुलकर्णी याने कानशिलात लगावून मारहाण केली. यानंतर माहिती मिळताच महानगरपालिकेचे सर्व अभियंते व अधिकारी यांनी कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे जमा होऊन घटनेचा तीव्र निषेध केला. प्रसाद पुराणिक यांच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.