माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन
पाळधी, ता. धरणगाव ( प्रतिनिधी ) – धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.


वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा
पाळधी रेल्वे स्थानकाच्या दौऱ्यावर आलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे तसेच भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रतापराव पाटील यांनी निवेदन सादर केले. यावेळी स्थानिक प्रवाशांच्या अडचणींसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रवाशांची होत आहे गैरसोय
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून परिसरातील विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आणि रुग्ण मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत. मात्र अनेक महत्त्वाच्या गाड्यांना येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना भुसावळ किंवा जळगाव येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि अतिरिक्त श्रमांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
‘या’ गाड्यांना थांबा देण्याची मागणी
निवेदनाद्वारे गाडी क्रमांक १२१११ सूरत-अमरावती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १९००७ सूरत-भुसावळ एक्स्प्रेस तसेच खान्देश एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १९००३) वांद्रे टर्मिनस-भुसावळ या गाड्यांना पाळधी रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, या गाड्यांना थांबा मिळाल्यास हजारो प्रवाशांची मोठी सोय होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी, शेतकऱ्यांना कृषी कामांसाठी तसेच रुग्णांना उपचारासाठी मोठा दिलासा मिळेल. तसेच रेल्वे स्थानकाच्या विकासाला चालना मिळून परिसराच्या आर्थिक प्रगतीलाही मदत होणार आहे.
सकारात्मक विचाराचे आश्वासन
या मागणीबाबत वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक आणि गांभीर्याने विचार केला जाईल, अशी भूमिका व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. यावेळी माजी सरपंच अरुण पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.









