मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणशेवगे शिवारात एक संतापजनक आणि अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. शेतात एकट्या असलेल्या एका ३९ वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून, तिच्याकडे अत्यंत वाईट उद्देशाने शारीरिक सुखाची मागणी करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर, “जर माझ्यासोबत आली नाहीस, तर तुझ्या नवऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून टाकेन,” अशी थेट धमकी या विकृत प्रवृत्तीच्या संशयिताने विवाहितेला दिली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


शेतात गाठून केली लज्जास्पद मागणी
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित ३९ वर्षीय विवाहित महिला ही २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होती. यावेळी गावातीलच संशयित आरोपी प्रभाकर लक्ष्मण पवार (रा. ता. चाळीसगाव) हा अत्यंत वाईट हेतूने तिच्या शेतात शिरला. तो पीडितेजवळ गेला आणि म्हणाला, “इथे तुझे शेत आहे. माझ्यासोबत चल, तुला काय करायचे आहे ते मी पाहून घेईन. तुला काहीच होणार नाही, जे होईल ते मी बघेन. मला तुला एकदा स्पर्श करायचा आहे.” त्याच्या या बोलण्याला जेव्हा पीडितेने तीव्र विरोध केला, तेव्हा त्याने तिला अंगावर काटा आणणारी धमकी दिली.
“नवऱ्याला ट्रॅक्टरखाली दाबून टाकेन!”
संशयित नराधम प्रभाकर पवार एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेला धमकावत म्हटले, “तू जर माझ्यासोबत आली नाहीस, तर तुझ्या नवऱ्याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली दाबून टाकेन आणि त्याला चालण्यालायक ठेवणार नाही. मग तो एकाच जागेवर बसून राहील, तेव्हा तू काय करशील?” या भीषण धमकीमुळे पीडिता प्रचंड हादरली. धक्कादायक बाब म्हणजे, संशयित आरोपी गेल्या पाच दिवसांपासून सतत पीडितेचा वाईट उद्देशाने पाठलाग करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता. अखेर या त्रासाला कंटाळून आणि पतीच्या जिवाला धोका असल्याचे पाहून महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.
मेहुणबारे पोलिसांत ‘ई-साक्ष’ प्रणालीद्वारे गुन्हा दाखल
या गंभीर प्रकरणाची दखल घेत मेहुणबारे पोलिसांनी २८ मे २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आधुनिक ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण अजयसिंग दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.









