
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळद खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व पत्रकार शेखर साहेबराव पाटील (वय ५०) यांनी गावातील गाळण धरणावरील पाणीपुरवठा योजनेसंदर्भात ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. याच कारणावरून त्यांच्याशी संशयित आरोपींचा वाद झाला.
ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मारहाण
२० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०.४० वाजता बाळद खुर्द ग्रामपंचायतीच्या गेटसमोर रस्त्यावर शेखर पाटील यांना काही जणांनी अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी तसेच फावडे व टिकावाच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत त्यांच्या दोन्ही पायांच्या मांडीला, पाठीला तसेच चेहऱ्यावर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यावेळी संशयित आरोपींनी पाटील यांना धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या झटापटीत त्यांचा मोबाइल फोन फुटून नुकसान झाल्याचेही पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी दीपक नथ्थू पवार, निशांत प्रमोद सोमवंशी, दर्शन जयकुमार सोमवंशी, बंटी बच्चाव, प्रणव पाटील, महेश ऊर्फ शितल प्रकाश सोमवंशी, गोपाल वसंत चिंचोले, तुळशीदास आँकोर मोरे, राजेंद्र शिवदास मोरे आणि जयकुमार रतन सूर्यवंशी यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 118(1), 45, 189, 190, 191(1), 115(2), 352 आणि 324(1) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गनगे करीत आहेत.








