जळगाव शहरातील समता नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील समता नगर येथील एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दीपक नारायण लोहार (वय २८,रा.समता नगर,जळगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दीपक लोहार हा मुळ जामनेर तालुक्यातील तोंडापुर येथील रहिवाशी होता. काही वर्षांपुर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर दीपक जळगाव शहरातील समता नगरात राहणाऱ्या अनिता ढोले या त्याच्या बहिणीकडे रहायला आला होता. तर आई तोंडापुरलाच राहत होती. दरम्यान, दीपक हा पाच बहिणीचा एकुलता एक भाऊ होता, त्याच्या पश्चात आई व पाच विवाहित बहिणी असा परिवार आहे. दीपक हा रिंगरोड परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला होता. दीपक सकाळी ११ वाजता घरी आल्यानंतर दिवसभर झोपला होता.
त्यावेळेस बहिण अनिता ढोले यांनी आपल्या घरातील गणपतीचे विसर्जनाची तयारी सुरु केली. विसर्जनासाठी भावाला देखील उठवायला गेल्या. मात्र, भाऊ आला नाही. त्यानंतर अनिता ढोले या आपल्या परिवारासह गणपती विसर्जनासाठी गेल्या. यावेळेस घरात कोणीही नसताना दीपकने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. अनिता या घरी परतल्यानंतर त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत भाऊ दीपक दिसून आला. त्यांनी हंबरडा फोडल्यानंतर नागरिक जमा झाले. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.