जळगाव तालुक्यातील नागझिरी येथील घटना, एक अटकेत
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागझीरी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातून १० हजार रूपये किंमतीची केबल वायर चोरून नेल्याची घटना मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी साडेसात वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून संशयित लकड्या पावरा याला अटक करण्यात आली आहे.
तालुक्यातील नागझीरी शिवारात हर्षल अनिल बारी (वय २४ रा. शिरसोली ता. जळगाव) याचे शेत गट क्रमांक ३४ मध्ये शेत आहे. त्यांनी शेतातील ट्यूबवेलमध्ये पानबुडी लावलेली आहे. मंगळवारी दि. १७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी लकड्या भिला पावरा (वय ३८ रा. धवली ता. सेंधवा जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांच्यासह इतरांनी याने शेतातील पानबुडीचे नुकसान करून केबल वायरची चोरी केली. तसेच शिवारातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवरील वायर तोडून नुकसान करून वायर चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायंकाळी साडेसात वाजता हर्षल बारी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी लकड्या भिला पावरा यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुर्यकांत नाईक हे करीत आहे.