जामनेर पोलिसांत ४ जणांवर गुन्हा
जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील देवपिंप्री येथे विहिरीतील दगड उचलण्याच्या किरकोळ कारणावरून एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला लाठीकाठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित वृद्धाच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवपिंप्री (ता. जामनेर) येथील रहिवासी रामसिंग महीपत तागवाले (वय ७५, व्यवसाय- वयस्कर/शेतकरी) हे ११ जून २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात होते. यावेळी त्यांच्या शेतातील विहिरीत टाकलेले दगड उचलण्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्याने संशयित आरोपींनी रामसिंग आणि त्यांची पत्नी रुखमाबाई रामसिंग तागवाले यांना अद्वातद्वा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयित सतीश तागवाले, दिपाली तागवाले आणि मंगलाबाई तागवाले यांनी हातातील लाकडी काठ्यांनी रामसिंग व त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर, हातापायांवर, पाठीवर आणि कमरेजवळ सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याच वेळी मुख्य संशयित भगवान तागवाले याने दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
मारहाण करत असताना संशयितांनी वृद्धाला धमकावले की, “तुमच्या शेतात टाकलेल्या विहिरीतील दगड आम्ही उचलणार नाही. या प्रकाराबाबत जर पोलिसात तक्रार करायला गेलात, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, जीवे मारून टाकू.” या हल्ल्यानंतर जखमी वृद्ध दाम्पत्याने ११ जून रोजी दुपारी ११:५८ वाजता जामनेर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
पीडित रामसिंग तागवाले यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसांनी संशयित आरोपी भगवान महीपत तागवाले, सतीश भगवान तागवाले, दिपाली सतीश तागवाले, मंगलाबाई भगवान तागवाले (सर्व राहणार: देवपिंप्री, ता. जामनेर, जि. जळगाव) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







