वरणगाव प्रतिनिधी : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांनी आज वरणगाव येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे तसेच विविध पक्षांच्या नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली.



यावेळी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच अपक्ष गटातील एकूण 17 नगरसेवक उपस्थित होते. बैठकीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांपुढील विविध प्रश्न, शहर विकास, नागरी सुविधांचा विस्तार तसेच आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.
विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडणाऱ्या नेतृत्वाची आवश्यकता व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, विकासकामांना गती आणि लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांबाबत सकारात्मक वातावरणात विचारविनिमय झाला.

यावेळी बोलताना अनिल चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभावी आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वरणगाव येथील नगराध्यक्ष सुनील काळे तसेच सर्व नगरसेवकांनी दिलेल्या सन्मान, आत्मीयता आणि शुभेच्छांबद्दल अनिल चौधरी यांनी आभार व्यक्त केले.
बैठकीस विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.







