पाचोरा येथील प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : ऑनलाईन गेमिंग वेबसाईटवरून गेम खेळून मोठ्या प्रमाणावर पैसे जिंकू शकता असे आमिष दाखवून पाचोरा येथे राहणाऱ्या शासकीय ठेकेदाराला वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपये घेऊन ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी रविवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पाचोरा येथे रोशन पदमसिंह पाटील (वय-२७, रा. पाचोरा) यांना वेगवेगळ्या नंबरवरील मोबाईलधारकांनी रोशन पाटील यांच्याशी ३ नोव्हेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये संपर्क साधून ऑनलाइन गेम खेळल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैसे किंकता येतील असे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांना ७ लाख रुपये नफा मिळाला भासवून अज्ञात मोबाईलधारकांनी रोशन पाटील यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने तब्बल ७८ लाख ९० हजार ५०० रुपये ऑनलाईन नेट बँकिंग तसेच वेगवेगळ्या बँक खात्यातून स्वीकारले.
दरम्यान त्यानंतर पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी अखेर रविवारी १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल धारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहे.