जळगाव (प्रतिनिधी)- दिल्लीतील दंगल हे पुर्णपणे गुप्तचर खात्याचे अपयश आहे. असे झालेच कसे असा गंभीर प्रश्न आहे. मी पंतप्रधान मोदींकडे गुप्तचरांच्या अपयशाची मागणी करणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारतात असतांना गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरतेच कशी?, असे प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
राज्य सरकारच्या कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेत आत्तापर्यंत झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जळगावात आलेल्या खा. सुप्रिया सुळे पत्रकारांशी वार्तालाप करीत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, जळगाव जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षणाचे जे काम झाले आहे, ते राज्यसरकारला सांगुन येथील कामाच्या अनुभवावरून काही धोरणात्मक सुधारणा करता येतील का? यासाठी आपण राज्यसरकारकडे प्रयत्न करणार आहोत.पुढे बोलतांना त्यांनी सीएए कायद्याबद्दल बोलणे टाळत, महिलांवरील अत्याचारांबद्दल सांगितले की, अशा घटना दुर्देवी आहेतच. कायदे करूनही अपेक्षित फलनिष्पत्ती दिसत नाही. त्यामुळे राज्यात आणखी कठोर किंवा नविन कायदे करता येतील का? याचा विचार झाला पाहिजे.
फडणविसांचे बौध्दीक
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की, सौभाग्याचे प्रतिक असलेल्या बांगड्यांचा या राज्यातील आम्हा महिलांना सार्थ अभिमान आहे. अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ माँ साहेब, ताराराणी, सावित्रीबाई फुले या सगळ्या कतृत्ववान महिलांचे आदर्श महिलांबद्दल अवमानकारक बोलणार्यांनी लक्षात घ्यावे. बांगड्या म्हणजे कमजोरी नाही. विरोधी नेत्यांनी महिलांचा अवमान केला असला तरी, बांगड्यांची ताकद आम्हाला माहिती आहे. त्यामुळे यापुढे तरी त्यांनी महिलांबद्दल बोलतांना सबुरीने बोलावे.
अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, तुर कापसासह सर्वच शेतमालाला हक्काचा भाव मिळावा हे धोरण महाविकास आघाडी सरकारने आपल्या संयुक्त किमान कार्यक्रमात स्विकारलेले आहे. केंद्र व राज्य सरकार मिळून या मुद्यावर या पुढच्या काळात प्रभावी काम करतील,असेही त्या म्हणाल्या.