नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतही कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. न्यूयॉर्क शहर हे अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे मुख्य केंद्र बनले आहे. दरम्यान कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. यामधील अनेकांचा बळी गेला आहे. नुकताच न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशााचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचं निधन झालं आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे.
भारत-अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यात ब्रह्म कांचीबोटला यांचा मोठा वाटा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमधून सांगितलं आहे. नरेंद्र मोदींनी पत्रकार ब्रम्ह कांचीबोटला यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, ‘भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांच्या निधनाची माहिती मिळाली. या घटनेने दुःख झाले. भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे ते नेहमी स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत माझी सहानुभूती आहे. ओम शांती’ ब्रह्म कांचीबोटला हे युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे माजी सहकारी होते. सोमवारी रात्री न्यूयॉर्कमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.