नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. त्यापैकी 229 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 62 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 328 नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात 490, केरळमध्ये 295, तामिळनाडूमध्ये 411, दिल्लीमध्ये 219, आंध्र प्रदेशमध्ये 164, राजस्थानमध्ये 179, तेलंगणामध्ये 127, कर्नाटकामध्ये 121, उत्तरप्रदेशमध्ये 174, मध्यप्रदेशात 154रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करायच्या आहेत. मोदी म्हणाले होते की, आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या धार्मिक प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, 9000 लोकांना ट्रॅक करण्यात आलं आहे. या लोकांचा संबंध तब्लिकींशी होता. यामध्ये 1306 विदेशी नागरिक आहेत. तर दिल्लीत शोधण्यात आलेल्या 2500 लोकांपैकी 250 विदेशी नागरिकांचा समावेश होता. यापैकी 1804 लोकांना कॉरन्टाईन करण्यात आलं आहे. कोरोनाटी लक्षणं असलेल्या 334 लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील 24 तासांमध्ये 12 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.