मुंबई (वृत्तसंस्था) – गुजरात राज्यातील पोरबंदर, वेरावळ, सौराष्ट्र इत्यादी भागात मासेमारी बोटींवर महाराष्ट्रातील डहाणू, तलासरी व गुजरातमधील नारगोळ, उंबरगाव, नांनापोंढा या भागातील खलाशी म्हणून काम करणाऱ्या सुमारे सतराशे नागरिकांना दक्षिण गुजरातमधील स्थानिक मच्छीमारांनी आपल्या बंदरावर उतरण्यास मज्जाव केला होता. मात्र, गुजरात प्रशासनाने मध्यस्थी करून या खलाशांना नारगोळ व उंबरगाव दरम्यानच्या खाडीमध्ये उतरवलं आहे. खलाशांना घेऊन आलेल्या बावीस बोटी नारगोळ जवळ खाडीमध्ये नांगरण्यात आल्या असून या 22 बोटींमधील खलाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गुजरात शासनाने व्यवस्था केली आहे. दक्षिण गुजरात भागातील अनेक तरुण हे खलाशी म्हणून अन्य भागांमध्ये कामानिमित्त जात असतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने हे खलाशी पुन्हा आपल्या घराकडे निघाले आहेत. दक्षिण गुजरातमधील नारगोळ व लगतच्या मासेमारी बंदरावर स्थानिकांनी या मंडळीला उतरण्यास मज्जाव केला होता. प्रत्येक बोटीवर शेकडो खलाशी एकत्रित प्रवास करीत होते. याबाबत गुजरात राज्यातील शासकीय विभागाने मध्यस्थी केल्यानंतर या खलासी मंडळींना नारगोळ-उमरगाव खाडीत उतरवण्यात आलं. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मच्छीमार संघटनेच्या व्यक्तीने दिली. या सर्व खलाशांचे अलगीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. परंतु या 1700 लोकांची तपासणी केली असता यातील फक्त एका व्यक्तीला थोडी सर्दी, खोकला असल्याची माहिती असून तो वळसाड जिल्ह्यातील नानापोंडा येथील आहे