मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहे. सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. येत्या 5 एप्रिल रोजी ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020’ घेतली जाणार होती. आता ही परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांसह सर्व अभ्यासिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी गावाकडील घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु, परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आयोगाकडून अधिकृत घोषणा केली जात नाही. तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी पुण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हॉटेल्स, खानावळ बंद होत्या. यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली.आता लोकसतेवा आयोगाने 5 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी ‘एमपीएससी स्टुडेंट राईटस’ संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. अखेर आयोगाने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 5 एप्रिल रोजी घेतली जाणारी ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020’ आता 26 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. तर ‘महाराष्ट्र दुप्पम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2020’ येत्या 3 मे ऐवजी 10 मे रोजी घेतली जाणार आहे.