एरंडोल ( प्रतिनिधी ) – येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या समर्थनार्थ काही भागात बॅनर लावलेले होते. काही अज्ञात व्यक्तीनी त्यातील आमदार चिमणराव पाटील व त्यांचे पुत्र अमोल पाटील यांचे फोटो व काही ठिकाणी बॅनर फाडून टाकले आहेत.
एरंडोल व पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे एरंडोल येथे त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोठा आक्रोश मोर्चा काढला होता. यात जवळपास शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते. एरंडोल तालुक्यातून व शहरातून त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध दिसून आला.
याच पार्श्वभूमीवर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथ विधी व बहुमत चाचणी नंतर प्रथमच आमदार चिमणराव पाटील यांचे आपल्या एरंडोल व पारोळा मतदार संघात आगमन होणार असल्याने ६ जुन रोजी शहरातील पंचायत समिती, मरिमाता चौक, म्हसावद नाका, हिंगलाज कॉलनी, नथ्थु बापु आदी ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी बॅनर लावले होते. यातील बहुतांश बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडले असून काही ठिकाणी आमदार चिमणराव पाटील व जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांचे फोटो कापुन फेकले होते. ही बाब आमदार चिमणराव पाटील यांच्या समर्थकांना कळताच त्यांनी स्वतः हुन बॅनर काढून घेतले असून पोलिसांत याबाबत कुठलीच नोंद झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. आ. चिमणराव पाटील यांची काल सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली यात शिवसेना कार्यकर्ते यांनी मला खुप त्रास दिला आहे. यासह आ. गुलाबराव पाटील यांच्या वर पण आरोप केले.