भुसावळ(प्रतिनिधी)- तालुक्यातील खडका गावानजीक रस्त्याच्या कडेला मोराच्या मागे श्वान लागल्याने त्याच्या तावडीतून शेख समीर शेख नवाब यांनी मोराला वाचवून जीवनदान दिले.
याबाबत माहिती अशी की, आज अकरा वाजेच्या दरम्यान खडका गावाकडील न्यू ईदगाह कॉलनी जवळील बागवान हॉलच्या शेजारी एका मोराच्या मागे कुत्रे लागल्याचे शेख समीर शेख नवाब यांना आढळून आले. ते बागवान हॉल जवळील रहिवाशी राहत असून लाईट फिटींगचे काम करण्यासाठी जात असतांना त्यांना हा प्रकार दिसला. यामुळे त्यांनी तातडीने मोराला वाचवून जीवनदान दिले. त्यानंतर बाजारपेठ पोलिस स्टेशनला मोराला आणून पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या भेट घेतली असता त्यांनी ठाणे अंमलदार बालक बार्हे यांना वन विभागाच्या कर्मचार्यांना फोन लावून बाजारपेठ पोलिस स्टेशनला बोलविण्याच्या सूचना दिल्या. श्वानांनी जखमी केलेल्या मोराला बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस कर्मचारी स्वाती सोळुंखी यांनी प्रथमोपचार केले. यानंतर वनरक्षक विजय भाईदास माळी यांच्याकडे सपोनि. संदीप परदेशी, सुभाष साबळे, रवी तायडे, संजय भदाणे, स्वाती सोळुंखी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पक्षी मोराला ताब्यात दिले.