पुणे (वृत्तसंथा) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे-मुंबईदरम्यान हायपर लूप प्रकल्प स्वीस चॅलेंज पद्धतीने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येणार आहे. सध्या प्रकल्पासंदर्भात आर्थिक व इतर दायित्वे, भूसंपादन, सवलती, जोखीम विश्लेषण व नियोजन यानुषंगाने महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरणाच्या (महा-आयडिया) स्तरावर छाननी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुणे-मुंबई हायपर लूप प्रकल्पासंदर्भात विधानपरिषदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर शिंदे यांनी ही माहिती दिली. पुणे-मुंबईदरम्यान अतिवेगवान प्रवासासाठी सुमारे 70 हजार कोटी रुपये खर्चाचा हायपर लूप प्रकल्प प्रस्तावित आहे.
सुरुवातीच्या टप्प्यातील गहुंजे ते ओझर्डेदरम्यान साकारण्यात येणाऱ्या चाचणी ट्रॅकसाठी लागणाऱ्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी डीपी वर्ल्ड या कंपनीच्या प्रतिनिधींची मे 2019 मध्ये जिल्हाधिकारी यांच्याबरोबर प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली होती. ब्रिटीश उद्योजक आणि वर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी डिसेंबर 2019 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करून चर्चा केली, अशी माहिती शिंदे यांनी दिली.