जळगाव (प्रतिनिधी)- जामनेर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात स्वत: पीडीत मुलगी व तिची आई फितूर होऊनही सरकार पक्षाने घेतलेल्या उलट तपासणीत सर्व पुरावे समोर येऊन आरोपीला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
25 सप्टेंबर 2015 रोजी रात्री ही घटना घडली होती. अन्सार शाह शब्बीर शाह (वय-30,रा.ब्राम्हंदे,ता.मोताळा, जि.बुलडाणा) असे शिक्षश ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील एकावर बैलाने हल्ला केला होता. यामुळे तो प्रौढ पत्नीसह बुलडाणा येथे उपचारासाठी गेला होता. यावेळी त्यांच्या घरी 15 वर्षीय मुलगी व लहान मुलगा असे दोघेच घरी होते. तर गावात विहिरींचे काम करणारा अन्सार शाह शब्बीर शाह (वय-30,रा.ब्राम्हंदे,ता.मोताळा, जि.बुलडाणा) याने त्या व्यक्तीच्या 15 वर्षीय मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी अन्सार शाह याच्या विरूध्द अत्याचार, पोक्सो कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा जामनेर पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बारकु जाने याने तपास करून न्यायालयात दोषारोप सादर केले. न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान, पीडीत मुलगी व तिची आई दोघी जणी फितूर झाल्या होत्या. परंतु, सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी पीडित मुलगी व तिची आईची उलट तपासणी घेण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्यानंतर दोघींची उलट तपासणी घेण्यात आली. यात अॅड. काबरा यांनी योग्य तो पुरावा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हा पुरावा न्यायालयाने मान्य करीत अन्सार शाह याला दोषी धरून शिक्षा ठोठावली.