नवी दिल्ली (वृत्तसंथा) – सर्वोच्च न्यायालयाला पुढील आठवड्यात होळीनिमित्त सात दिवसांची सुटी आहे. पण या काळात महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी सुटीच्या काळातील खंडपीठ (व्हेकेशन बेंच) तयार करण्याची घोषणा सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गुरुवारी केली.
पुढील आठवड्यात होळीच्या दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी हे खंडपीठ महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी उपलब्ध असणार आहे. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात केवळ उन्हाळ्याच्या सुटीच्या काळातच व्हेकेशन बेंच कार्यरत असत. पण आता पहिल्यांदाच होळीच्या सुटीसाठीही अशा पद्धतीने व्हेकेशन बेंच कार्यरत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी ही माहिती दिली. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दाखल याचिकांवर केंद्र सरकार येत्या दोन दिवसांत आपली बाजू सर्वोच्च न्यायालयापुढे मांडेल, असे महाधिवक्ता के.के.वेणूगोपाल यांनी न्या. शरद बोबडे यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठात सांगितले. त्यानंतर सरन्यायाधीशांनी होळीच्या सुटीनंतर या प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणी करावी, असे कपिल सिब्बल यांना सांगितले. 9 ते 15 मार्च या काळात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालय व्हेकेशन बेंच तयार करून काम करणार आहे. केवळ अत्यावश्यक प्रकरणाची सुनावणी या काळात होणार आहे.