मुंबई (वृत्तसंस्था) – लातूर येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात काही काळ कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 22 कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रूग्ण नाक, कान, घसा विभागात आला होता. त्यामुळे या संपूर्ण विभागाचे निर्जंतूकीकरण करून विभाग पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.पी. जमादार यांनी पत्रकाद्वारे दिली.
एमआयटी लातूरच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात 20 मे रोजी नाक, कान, घसा विभागात एक रूग्ण नाकाच्या विकाराची तपासणी करण्यासाठी आला होता. त्याची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, त्या रूग्णांमध्ये ताप, खोकला आणि कोरोनासदृश्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्या रूग्णाची शस्त्रक्रिया न करता विलासराव देशमूख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर या शासकीय रूग्णालयात त्याला पाठविण्यात आले. शासकीय रूग्णालयात त्याची तपासणी केली असता तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयात रूग्ण काही काळासाठी आल्याने लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्णाच्या संपर्कात आलेले सर्व संबंधीत डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचारी अशा एकूण 22 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या सर्वांची औषध उपचारासह राहण्याची, जेवणाची वेगळी सोय करण्यात आली आहे, अशी माहीती डॉ. जमादार यांनी दिली. यशवंतराव चव्हाण ग्रामीण रूग्णालयातील नाक,कान, घसा हा विभाग नियमाप्रमाणे पुर्णपणे निरर्जंतूकीकरण करून पूर्ववत सुरू करण्यात आला आहे अशीही माहीती डॉ. जमादार यांनी दिली.