मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईत पोलिसांना सतत कोरोना व्हायरसची लागण होत असून ताजे प्रकरण ओशिवारा पोलिस ठाण्याचे आहे. येथे १२ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आतापर्यंत मुंबईत ७६२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर महाराष्ट्रात १६०० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज्यात या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत १६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या एका आठवड्यात एकूण ६८६ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, जो आतापर्यंतच्या एका आठवड्यातील सर्वात मोठा आकडा आहे. या मुद्यावरून भाजपने सरकारवर पोलिसांची योग्य काळजी घेतली जात नसल्याचा आरोपही केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिसांची योग्य काळजी घेतली नाही आणि संरक्षण दिले नाही असा आरोप केला आहे. फडणवीस म्हणाले की, पोलिसांना संरक्षण पुरवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागच्या ४८ तासात २९० पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, ज्यात ४१ पोलीस अधिकारी आणि २३७ पोलीस कर्मचारी आहेत. आकडेवारीनुसार, गेल्या एका आठवड्यात संपूर्ण राज्यात ६८६ पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून या दरम्यान ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले की, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई किट, फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गोळ्या दिल्या जात आहेत. ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.