मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापनदिन साजरा केला जात आहे. मनसेच्या या 14 व्या वर्धापनदिनानिमित्त आज नवी मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्यात मनसेनी शॅडो कॅबिनेटची स्थापना केली. राज्यातील विविध विभागांवर नजर ठेवण्यासाठी या शॅडो कॅबिनेटची स्थापना झाल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं. मनसे कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागावे असं राज ठाकरे म्हणाले. राज्यात काही जण RTI टाकून लोकांना ब्लॅकमेल करतात. असा प्रकार कार्यकर्त्याने किंवा पदाधिकाऱ्यांनी करू नये असं राज ठाकरे यांनी बजावलं.
काही जण चांगल्या कामासाठी RTI टाकतात पण असेही काही लोक आहेत जे ब्लॅकमेलिंगचा व्यवसाय करतात असं राज ठाकरे म्हणाले.
मला विचारल्याशिवाय कुणीही पत्रकार परिषद घ्यायची नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. गृह, विधी, न्याय, सर्वसामान्य प्रशासन विभाग बाळा नांदगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे.राज्यातल्या महाविकास आघाडीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेटचा ठराव पहिल्या अधिवेशनात मांडला होता. या कॅबिनेटमध्ये मनसेच्या नेत्यांना खातेनिहाय जबाबदारीचे वाटप झालं. 1. विधी व न्याय, – बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजीव नाईक, राहुल बापट, 2. जलसंपदा, माहिती जनसंपर्क – अनिल शिदोरे, अमित ठाकरे, 3. गृहनिर्माण, वित्त नियोजन – नितीन सरदेसाई, 4. महसूल, परिवहन – आदित्य शिरोडकर, 5. ग्रामविकास – जयप्रकाश बावीसकर, अमित ठाकरे, प्रकाश भोईर, 6. वने, आपत्ती व्यवस्थापन – संजय चित्रे, अमित ठाकरे, संतोष धुरी, 7. शिक्षण – अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी , 8. कामगार – राजेंद्र वाघसकर, गजानन काळे, 9. नगरविकास, पर्यटन – संदिप देशपांडे, अमित ठाकरे, 10. सार्वजनिक आरोग्य – रिटा गुप्ता, 11. अन्न नागरी पुरवठा – राजा चौगुले, विशाल पिंगळे, 12. महिला व बालविकास – शालिनी ठाकरे, 13. सार्वजनिक बांधकाम – संजय शिरोडकर, 14. सांस्कृतिक कार्य – अमेय खोपकर
9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र निवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर मनसेनं उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन केलं. 2009 मध्ये मनसेने विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे 13 आमदार निवडून आले.








