नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – राजधानी दिल्लीत CAA विरोधात जो हिंसाचार उफाळला होता त्याबाबत आता अनेक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती पुढे येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असतानाच हा हिंसाचार उफाळला होता. त्यात 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचाराला ज्यांनी चिथावणी दिली त्यांना पाकिस्तानातून पैसा मिळाला होता अशी माहिती गुप्तचर सूत्रांना मिळाल्याचं बाहेर आलंय. यासंदर्भात काही पुरावे भारतीय संस्थांना मिळाले असून ते त्यांनी मानवाधिकार परिषदेत मांडले आहेत. जिनिव्हि इथं संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार परिषद सुरू आहे. त्यात भारताने हे पुरावे मांडले आहेत असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिलं आहे.
या आधीही अशा शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. भारतीय गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानातून भारतात केले जाणारे काही फोन टेप केले आहेत. त्यात हँडलर्स हे भारतातल्या हस्तकांना काही आदेश देत असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिल्लीत हिंसाचार भडकून जगभर भारताची बदनामी व्हावी यासाठी पाकिस्तान पूर्ण प्रयत्न करतोय. 2002 च्या गुजरात दंगलीच्या वेळीही पाकिस्तानने असेच केले होते. सीएए आणि त्याविरोधातलं आंदोलन हे पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात कुणीही दखल देऊ नये असं भारताने ठामपणे म्हटलं आहे. पोलिसांनी आम आदमी पक्षाचे निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या जवळील लियाकत, रियासत आणि ताकिर रिझवी यांना ताब्यात घेतले आहे. यापैकी लियाकत आणि रियासत चांद बाग, तारिक रिझवी जाकीर नगर येथील राहणारे आहेत. दिल्ली हिंसाचारानंतर ताहिर रिझवीने ताहिर हुसैन यांना आपल्या घरात लपवले होते. हिंसेदरम्यान ताहिर हुसैन ज्या लोकांच्या संपर्कात होता त्यापैकी 12 जणांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. दुसरीकडे तपास करण्यासाठी एसआयटी आणि एफएसएलची टीम शिव विहार येथील राजधानी पब्लिक शाळेत पोहोचली. तपासनंतर एसआयटी शाळा तात्पुरती बंद केली आहे.
आयबीचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेले ताहिर हुसैन यांची परवानाधारक पिस्तुल आणि 24 काडतुसे एसआयटीने ताब्यात घेतली आहे. पिस्तुल त्यांच्या घरातून जप्त करण्यात आली आहे. पिस्तुल आणि काडतुसं एफएसएल येथे पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ताहिर यांच्या घराजवळ अजय गोस्वामी नावाच्या एका तरुणाला गोळी झाडण्यात आली होती.
यामध्ये ताहिर यांच्या परवानाधारक पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता का? याबाबत एफएसएल तपास करणार आहे. आतापर्यंत एफआयआरमध्ये ताहिरचे नाव आहे. ताहिर यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला आहे.